लोकतंत्र न्यूज नेटवर्क -
जामखेड | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आपण उतरणार असल्याचे समजताच वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात राजकारण करणारे नेते एकत्र आले. चाळीस वर्षांचे राजकीय वैर विसरून हे सर्वजण माझ्या विरोधात एकवटले. मात्र, कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वतंत्रपणे लढत देत कर्जत-जामखेडचे दोन उमेदवार जिल्हा बँकेत निवडून आणले. आता जिल्हा बँकेसाठी एकत्र आलेले हेच नेते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र एकत्र दिसणार नाहीत, असा खोचक टोला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विखे-थोरात गटाला लगावला.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी जामखेड तालुक्यातून बिनविरोध निवड झालेल्या ॲड. सचिन (नाना) घुमरे यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि. ७ नोव्हेंबर) करण्यात आले होते. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा बँक ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा
प्रा. शिंदे म्हणाले, जिल्हा सहकारी बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या प्रश्नांसह विविध अडचणी सोडविण्यासाठी बँकेने पुढाकार घेणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ संचालक होण्यासाठी नसून ग्रामीण भागाचे आणि शेतकऱ्यांचे भविष्य घडविण्याची संधी आहे.
आपण जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले, तेव्हा काहींनी शिंदे सेटलमेंट करतील, अशी चर्चा सुरू केली होती. मात्र, माझी सेटलमेंट म्हणजे जिल्हा बँकेत माझे दोन उमेदवार निवडून आणणे, हे मी दाखवून दिले. माझ्या विरोधात एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले नेते गळ्यात गळे घालून फिरू लागले. गडाख साहेबांचे चाळीस वर्षांचे भांडण मिटले, थोरातांचेही मतभेद बाजूला पडले आणि सर्वजण माझ्याविरोधात एकत्र आले. मात्र, मी स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका कायम ठेवली आणि कर्जत-जामखेडचे दोन उमेदवार निवडून आणले, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
कर्जत-जामखेडच्या मातीशी बांधिलकी कायम!
मी महाराष्ट्र विधान परिषदेचा सभापती असलो तरी माझ्या मातीतील कर्जत-जामखेडची काळजी मला आहे. मात्र, कर्जत-जामखेडमधून निवडून आलेल्यांना महाराष्ट्राची काळजी असल्याचे दिसते. ते नेमके काय करतात? ते धंदा करायला येथे आले आहेत का? असा सवाल उपस्थित करत ते कधी गाशा गुंडाळतील, हे सांगता येत नाही, असा टोला त्यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला. तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीत आपल्याला सोडून गेलेल्यांसोबत सध्या दहा माणसेदेखील नसल्याची टिप्पणीही त्यांनी केली.
शेतकऱ्यांना समान न्याय देणार : सचिन घुमरे
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित संचालक ॲड. सचिन (नाना) घुमरे म्हणाले, नाहुली या छोट्याशा गावातून माझा प्रवास सुरू झाला. गावात विविध कार्यकारी सेवा सोसायटी स्थापन करण्यासाठी तब्बल पंधरा वर्षे प्रयत्न केले. मात्र, विरोधकांनी सोसायटी होऊ दिली नाही. अखेर सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर सोसायटीला तातडीने मंजुरी मिळाली. आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय देत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद, बापुराव ढवळे, रवि सुरवसे, भाजप नेते आजिनाथ हजारे, दत्तात्रय वारे, ॲड. अजय काशिद, बाजीराव गोपाळघरे, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, गटनेते तात्याराम पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश निमोणकर, बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार, श्रीराम डोके, ॲड. प्रविण सानप, नगरसेवक प्रा. विकी घायतडक, नगरसेविका नंदा होळकर, गणेश डोंगरे, प्रविण चोरडिया, अशोक शेळके, मनोज कुलकर्णी, पवन राळेभात, हर्षद काळे, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, शरद भोरे, डॉ. संजय भोरे, अंकुश ढवळे, सोमनाथ पाचरणे, बाजार समितीचे संचालक विष्णू भोंडवे, वैजिनाथ पाटील, नारायण जायभाय, राहुल बेदमुथ्था, डॉ. गणेश जगताप, सतीश शिंदे, ॲड. बंकटराव बारवकर यांच्यासह विजय पवार, संतोष गव्हाळे, अर्जुन म्हेत्रे, प्रविण होळकर, विशाल भांडवलकर, नागराज मुरुमकर, ऋषिकेश मोरे व तुषार बोथरा आदी उपस्थित होते.
यावेळी भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते, जामखेड तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकतंत्र | डिजिटल न्यूज पोर्टल\
🌐 loktantramedia.in
जाहिरात / Advertisement

जाहिरात / Advertisement
